Sunday, February 10, 2019

ग्रामसेवकांचे राशिभविष्य

🕺🏻 *ग्रामसेवकांचे राशी भविष्य*- © राजेश खाकरे
➖➖➖➖➖➖➖➖➖
        🌞 *_SUNDAY SPECIAL_*🌞
➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात आणि तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये काम करत असा, हे तुमचे राशिभविष्य तुम्हांला अचूक लागू पडेल.

■ *मेष:* 🐏

'अति घाई संकटात नेई' याचा परिचय तुम्हांला या महिन्यात येणार आहे. किर्द लिहितांना डोके शांत ठेवा. पाच-दहा रुपयाचा हिशोब न जुळल्याने काहीसा मनस्ताप संभवतो. बँक व हात शिल्लक यामुळे डोकेदुखी वाढत गेल्याचे लक्षात आल्याने हात शिल्लक न ठेवणेच हिताचे राहील. रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी वेळीच वेळ काढणे हितावह राहील. मासिकसभा,ग्रामसभा प्रोसीडींग वेळीच पूर्ण केल्याने कामात उत्साह येईल.

■ *वृषभ:*🐂

'एक ना धड भाराभर चिंध्या' असा काहीसा अनुभव तुम्हाला येणार आहे. पीएमएवाय,रमाई योजना,  शबरीयोजना,पाणीटंचाई, पांधणरस्ते, १४ वा वित्त आयोग, ,दलीतवस्ती योजना,एमआरईजीएस, स्वच्छ भारत मिशन,जलयुक्त शिवार, आणि यांसारख्या आणखी पाचपन्नास योजना आणि बैठका या कामामुळे डोके काहीसे सुन्न पडल्यासारखे वाटेल. कोठून आपण इथे येऊन पडलो असेही वाटून जाईल. मात्र मनोधैर्य जतन करण्याचा हा महिना आहे.हळूहळू सवय झाल्याने अंगात अवसान येईल. प्रत्येक विषय "टॉप प्रयोरिटी"चा असल्याचा जप वरिष्ठ अधिकारी मीटिंगमध्ये करतील, तो लक्ष देऊन ऐकावा.

■ *मिथुन:* 💑

'तंत्रज्ञान आल्याने काम सोपे होईल' हा भ्रम मनातून अजिबात काढुन टाकावा.माहिती सादर करताना सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन्हीही कॉप्या सादर कराव्या लागणार आहे,याचे भान ठेऊन वाटचाल करावी. प्रियासॉफ्ट व इतर 11 सॉफ्टवेअर, ईग्रामसॉफ्ट, प्लॅनप्लस, 1 ते 33 नमुने,  आवाससॉफ्ट,एमआवाससॉफ्ट, ही सर्व माहिती अतिशय सॉफ्ट मनाने भरावी. संगणक ऑपरेटरने टाळाटाळ केल्यास ते तंत्रज्ञान स्वतः आत्मसात करावे किंवा प्रसंगी पदरमोड करून नेटकॅफे गाठून कामे वेळेत पार पाडावी. आपला जिल्हा प्रत्येक कामात ऑनलाइनला एक नंबरला दिसेल याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात ठेवून वाटचाल करणे हिताचे राहील.

■ *कर्क:* 🦀

"उसातून जावे मात्र पाचट अंगाला लागू देऊ नये" हा मंत्र लक्षात ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.तुमची एखादी तक्रार आली म्हणजे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे लगेच संशयाने बघतील. तुम्ही गावात यापूर्वी कितीही चांगली कामे केलेली असली किंवा तुम्ही अगदी तुमच्या कामाला प्राधान्य देऊन जीव तोडून कामे करत असला तरी 15 रुपये देऊन टाईप केलेला एक अर्जाचा कागद तुम्हांला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यास, तुमची चौकशी करण्यास, तुम्हाला कारणे दाखवा नोटीस निघण्यास, तुम्ही अगदीच कामचुकार ठरण्यास पुरेसा आहे,ही जाणीव मनोमन ठेवावी.

■ *सिंह:* 🦁

काम नियमाने करावे अशी तुमची इच्छा जरी असली तरी नियमाला आणि प्रसंगी तुम्हांलाही धाब्यावर बसवून काम करवून घेणारे तुमच्याकडे येतील, अशा प्रसंगी डगमगून न जाता शांत राहून तुमचे ज्ञान पूर्वानुभव याचा सुयोग्य वापर करून असा प्रश्न सोडविणे हिताचे राहील. ज्याचे काम तुम्ही केले त्याच्यासाठी 'साहेब चांगले' आणि न झाल्यास 'साहेब खराब' हे दोन शिक्के तयारच असणार आहेत.त्याचा फारसा विचार न करता आपल्या कामावरच पूर्ण लक्ष केंद्रित करावे.

■ *कन्या:* 👩🏻‍🌾

"झाले बुवा एकदाचे काम पूर्ण" असा नुसता म्हणायचा अवकाश की दुसरे काम तुमच्या मोबाईलच्या whatsapp पडद्यावर दत्त म्हणून उभे असणार.त्यामुळे आता एक दोन दिवस फारशी कामे नाहीत असे दिवस सध्या तरी तुमच्या भाग्यात नाहीत. उलट दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी रविवारी कुठे फिरायला जाण्याचे आखलेले बेत शुक्रवारी आलेल्या साहेबांच्या मॅसेजमुळे/ईमेलमुळे रद्द करावे लागण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे "भीक नको कुत्रं आवर" अशीच तुमची मानसिकता या महिन्याच्या उत्तरार्धात होणार आहेत.

■ *तूळ:* ♈

एकाच गावात खूप दिवस झाल्यामुळे "अतिपरिचयात अवज्ञा" याचा काहीसा अनुभव आल्याने वरचेवर गाव बदलण्याबाबत तुमच्या मनात विचार डोकावून जातील. मात्र त्यासोबत तुम्ही गावासाठी केलेल्या धडपडीचे चीज गावात झालेल्या सकारात्मक कामातून दिसून आल्याने एक समाधानही तुमच्या चेहऱ्यावर झळकून जाईल.त्यावेळी तुमच्या मनोवृत्तीवरचा मळभ काही क्षण दूर होऊन तुम्हाला स्वतःलाच तुमच्या कार्याचा आणि पदाचा अभिमान वाटून जाईल. त्यात तुम्हांला झालेला सर्व त्रास,अडचणी वाहून जाईल आणि मन हलकेहलके वाटेल.

■ *वृश्चिक:* 🦂

एखाद्याचे काम न केल्यामुळे किंवा सत्ताधारी पार्टीच्या विरोधकांचे एखादे काम नियमात न बसल्यामुळे "ग्रामसेवक गावात येत नाही" किंवा तत्सम तक्रारींचा त्रास काहीसा जाणवेल. मात्र ती धग काहीशी कमी करायची असल्यास गावात गेल्यावर मुद्दाम सार्वजनिक लोकवस्तीच्या ठिकाणी जाऊन पाच दहा जणांना राम राम करून यावा. एखाद्या गल्लीतून कामाशिवाय चक्कर मारून यावी. यामुळे बराच फरक पडल्याचे जाणवेल.

■ *धनु:* 🏹

नोकरीत बढती मिळेल अशी आशा अजिबात करू नये, कारण ग्रामविकास अधिकारी झाले तरी तुमच्या पगारात दोनचारशे रुपयांपेक्षा जास्त फरक पडत नाही,तसेच सहाव्या वेतन आयोगात तुमच्यावर झालेला अन्याय पुढे सातव्या वेतन आयोगातही चालू राहील, याची कायम आठवण ठेवावी. कारण ग्रामसेवक हे गावपातळीवरील अत्यंत विश्वासू पद आहे असे शासनास फक्त कामे सोपवताना वाटते.. शाबासकी आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी कामाच्या प्रेरकतेसाठी आवश्यक असतात; मात्र तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला शाबासकी मिळण्याची हमी नसली तरी एखाद्या छोट्याशाही चुकीची मोठी शिक्षा मिळू शकते,याची जाणीव मात्र ठेवावी. तुम्हांला शाबासकी देऊन कुणीही प्रेरणा देणार नाही, त्यामुळे आपण स्वतः स्वयंप्रेरीत राहणेच श्रेयस्कर आहे.

■ *मकर:* 🐎

तुमचा अधिकारी तोपर्यंत तुमच्या सोबत आहे जोपर्यंत तुम्ही कुठल्या अडचणीत सापडलेले नाही. त्यानंतर मात्र तुम्ही तसे का केले हे विचारायला ते मोकळे असतात. त्यामुळे कार्यालयीन आणि लिखित आदेशच पाळावेत,याची जाणीव तुम्हांस होईल. उगीच भावनात्मक होऊन किंवा जास्तीचा विश्वास ठेवणे महागात पडू शकते. असे असले तरी काही अधिकाऱ्याकडून तुम्हांला सुखद अनुभवसुद्धा येऊ शकतो, मात्र असे अनुभव आणि अधिकारी अपवादात्मक असतात हे तुम्हांला कालानुरूप लक्षात येईल.

■ *कुंभ:*⚱

तुम्ही नोकरी करत असला तरी नोकरीतल्या चढउताराने फारसे विचलित होऊ नका.कारण तुमच्याकडे इतक्या गोष्टी आहेत की, एखादी गोष्टही तुम्हांला कचाट्यात पकडायला पुरेशी आहे. त्यामुळे नोकरी बरोबरच तुमचे कुटुंब, प्रेमाची माणसे, मित्रपरिवार यांनाही वेळ द्या.सुट्टीच्या दिवशी कुठे फिरायला जा. एखादा छंद जोपासा, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवा, सकारात्मक सामाजिक कामासाठी काही वेळ आणि पैसा खर्च करा. तुम्ही पोट भरण्यासाठी नोकरी करत असला तरी तुमच्या माध्यमातून अनेक लोकांची जीवने कळत नकळत सुखी होत असतात, तो ही आनंद घ्या. काम मन लावून करा, चांगले करा, तुम्हाला अधिक चांगला अनुभव येईल.

■ *मीन:*🐋

"पाण्यातला मासा झोप घेतो कैसा,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" ग्रामसेवकाच्या वेदना ग्रामसेवक झाल्याशिवाय कळणार नाहीत हेच खरे, त्यामुळे उगीच आपल्या जखमा इतरांना दाखवून उपयोग नाही . आपल्या जखमांवर आपणच इलाज करायला शिकायला हवे, त्यासाठी संघर्ष करायला हवे, संघटित रहायला हवे, अभ्यास करायला हवा, प्रसंगी नकार देता यायला हवे, ठाम राहता यायला हवे, आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही उंच भरारी घेता यायला हवी. प्रश्न असतील तर उत्तरे असतील. ग्रामसेवक असेल तर त्याच्यासमोर आव्हाने असतील.आव्हाने पेलण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, हे ही विसरून चालणार नाही. शेवटी गरिबांचे अश्रू पुसण्याचे भाग्य आपल्यापेक्षा जास्त कुणाला मिळालेले नाही, ही जाणीव सुखद अनुभव देणारी आहे.
© *ज्योतिषाचार्य राजेश खाकरे*
मो.७८७५४३८४९४


(माझी ही पोस्ट तुम्ही माझ्या नावासह इतर ग्रुपवर फॉरवर्ड करू शकता)

पंचायती-७

ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...