Thursday, October 15, 2020

पंचायती-६

गावातील ८०% लोकांना ग्रामपंचायतीशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना कुठला कागद लागलाच तर ते एखाद्यावेळी ग्रामपंचायतला येतील अन घेऊन जातील. ते त्यांच्या स्वतःच्या कामात गुंतलेले असतात. ते कुणाच्या अध्यामध्यात पडत नाही. १०% लोक ग्रामपंचायत बॉडीचे सदस्य आणि त्यांचे समर्थक असतात. तर उरलेले १०% लोक विरोधक. सगळा गोंधळ, राजकारण, चढाओढ, हेवेदावे ह्या २०% लोकांमध्येच चालू असतात. ह्या २०% मधील लोकच आलटून पालटून सरपंचाच्या खुर्चीवर बसतात. कामाच्या तक्रारी करतात,चौकशा लावतात, अर्ज-फाटे करतात. आणि गंमत अशी की ह्या सगळ्या गोष्टीचा डायरेक्ट त्रास ग्रामसेवकाला होतो.
© राजेश खाकरे
#पंचायती  दिनांक १५ ऑक्टोबर २०२०

पंचायती-५

एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयाकडून आवश्यक माहिती सहजपणे मिळावी हा या कायद्याचा उद्देश! मात्र काही समाजकंटक ढिगाने अर्ज अनेक कार्यालयांना करून फक्त शासकीय कार्यालयांचा वेळच वाया घालवीत नाहीत तर, प्रसंगी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंगही करतात. आपली चुकीची कामे करून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याच्या धमक्या देतात. असे लोकच लोकहिताच्या कायद्याचे खरे शत्रू आहेत!
© राजेश खाकरे
#पंचायती  दिनांक १५ ऑक्टोबर २०२०

Monday, October 12, 2020

पंचायती-४

केवळ पंचायत समिती पातळीवर अतिरिक्त गटविकास अधिकारी नेमून ग्रामपातळीवर विविध योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गती येणार नाही; तर जिथे प्रत्यक्ष अंमलबजावणी होते त्या ग्रामपंचायत स्तरावर "एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक", आणि त्यानंतर अतिरिक्त ग्रामसेवक नेमणूक झाली,तरच खऱ्या अर्थाने योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतात. दोन हातांनी पन्नास कामे एकाचवेळी करण्याची अपेक्षा ठेवली तर 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशीच गत होणार!
© राजेश खाकरे
#पंचायती  दि.१२ ऑक्टोबर २०२०

Saturday, October 10, 2020

पंचायती-०३

ग्रामपंचायत ही गावपातळीवरील सर्वात महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत राज पद्धतीत जेवढे महत्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांना आहे तेवढेच महत्व ग्रामपंचायतींना आहे. किंबहुना प्रत्यक्ष जनतेपर्यंत योजना पोहचवणारी व अंमलबजावणी करणारी यंत्रणा ग्रामपंचायत आहे. ग्रामसेवक हा या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एकमेव मुख्य सचिव आहे. म्हणून ग्रामपंचायत जर अधिक सक्षम करायची असेल तर ग्रामसेवकाला सक्षम करावे लागेल. ग्रामसेवकांवरील कामाचा बोजा, अधिकार आणि त्याच्या वेतनत्रुटी बघता ग्रामपंचायत सक्षम होण्यास अजून बराच कालावधी जावा लागणार हे निश्चित आहे!
© राजेश खाकरे
#पंचायती - १० ऑक्टोबर २०२०

Friday, October 9, 2020

पंचायती-०२

आज काल प्रत्येक विभाग गावपातळीवर त्यांच्या विभागाच्या  कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी सोपविण्याऐवजी ती जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपवत आहे; यामुळे ग्रामसेवकांवर आज कामाचा ताण वाढत असला तरी,त्या त्या विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ती धोक्याची घंटा आहे. कारण काही वर्षांनी त्यांनी पदे निरुपयोगी ठरवून बंद होण्याची शक्यता आहे. माणसाला आधी शेपटी होती. तिचा वापर बंद झाल्याने ती गळून पडली. ज्या गोष्टी वापरल्या जात नाही त्या बंद होतात असे विज्ञान सांगते.
© राजेश खाकरे
#पंचायती

पंचायती-०१

ग्रामपंचायत अशी गोष्ट आहे, तिथे जगावेगळ्या समस्या निर्माण होतात. ज्याचा अंदाज नियम कायदे बनवणाराला पण नसेल, नियम आणि वस्तुस्थिती याची सांगड घालण्यासाठी 'ग्रामसेवक' म्हणून जन्म व्हावा लागतो!😃
© राजेश खाकरे
#पंचायती

पंचायती-७

ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...